नमस्कार,
दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी, आनंदीबाई रावराणे यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी यांच्यावतीने तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दोन गटांमध्ये घेतलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयांतील एकूण ३६ स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे, स्थानिक समिती सचिव श्री. प्रमोदजी रावराणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी सर, राष्ट्रीय अर्बिटर श्री. श्रीकृष्णा आदिलकर सर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेची सुरुवात श्रीमती आनंदीबाई रावराणे यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कनिष्ठ महाविद्यालय गटात प्रथम क्रमांक विघ्नेश अंकुश घाडी, द्वितीय क्रमांक शाहनवाज सादिक चोचे आणि तृतीय क्रमांक सत्यजीत सत्यवान शेळके (सर्व आचिर्णे कनिष्ठ महाविद्यालय) यांनी पटकावला. माध्यमिक विद्यालय गटात प्रथम क्रमांक राधाकृष्ण चकोर गावकर (माधवराव पवार विद्यालय, कोकिसरे), द्वितीय क्रमांक अथर्व रमेश कुडतरकर आणि तृतीय क्रमांक ओंकार शिवदास कदम (अभिनव विद्यमंदिर, सोनाळी) यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ₹२०००, ₹१५०० आणि ₹१००० रोखरक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला आणि विजेत्यांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, रणनीती आणि क्रीडास्पर्धेची भावना वृद्धिंगत झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.