Activities

One Day Hands-On Training Program On Plant Grafting Techniques 2025

शेतीत नवे कौशल्य – कलम बांधणी प्रशिक्षणातून आत्मनिर्भरतेचा मार्ग

वैभववाडी – महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे वनस्पतीशास्त्र विभाग, IQAC (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष) आणि PM उषा यांच्या संयुक्त विद्यमाने "कलम बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम" दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी यशस्वीरीत्या पार पडला.

या प्रशिक्षणात शेतकरी व विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. एकूण ३७ सहभागी या उपक्रमात सहभागी झाले होते. प्रशिक्षणामध्ये सॉफ्टवुड ग्राफ्टिंग, टी-बडिंग, क्लेफ्ट ग्राफ्टिंग यांसारख्या कलम बांधणीच्या विविध पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचा उद्देश शेतकरी आणि विद्यार्थ्यांना कलम बांधणीचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान देऊन त्यांचे कृषी कौशल्य विकसित करणे हा होता. या उपक्रमातून उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, पर्यावरणपूरक शेतीची दिशा, तसेच व्यावसायिकतेचा दृष्टिकोन विकसित करणे यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि कृषी आधारित उद्योजकतेची बीजे पेरण्याचे कार्य या प्रशिक्षणातून साध्य झाले.

या प्रशिक्षणात कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय वळवंडे, देवगड येथील मार्गदर्शक प्रा. विनायक ठाकूर यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी कलम तंत्रज्ञानातील बारकावे, नवे प्रयोग व उत्पादनक्षमतेसाठी आवश्यक असलेली कौशल्ये यावर सखोल माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहभागींच्या ज्ञानात लक्षणीय वाढ झाली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित करत, “कलम बांधणीसारख्या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते,” असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सचिन पाटील, तर कार्यक्रम सचिव डॉ. विजय पैठणे होते. त्यांच्या कुशल नियोजनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सहभागी शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून, भविष्यात अशा प्रकारचे अधिक प्रशिक्षण उपक्रम आयोजित करावेत, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली.